एमएचटी-सीईटीचे निकाल जाहीर : राज्यात ७ हजार ५0६ विद्यार्थी पात्र नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) अखेर गुरुवारी रात्री उशिरा ११ वाजता वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला. हा निकाल नेमका किती वाजता जाहीर होईल, याबाबत दिवसभर विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता होती. आधी दुपारी २ वाजता, नंतर ४ वाजता निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात येत होते. शेवटी रात्री ११ चा ठोका पडला अन् सीईटीचा निकाल जाहीर झाला. डीएमईआरने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निकालानुसार मेडिकल व डेन्टल अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील ७ हजार ५0६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यासाठी डीएमईआरने गत ८ मे रोजी राज्यभरात सीईटीची परीक्षा घेतली होती. यामध्ये नागपूर विभागातील १४ हजार ३0२ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली होती. राज्यातील ३९0 परीक्षा केंद्रांवर १ लाख ४८ हजार ३९७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यामध्ये ६५ हजार ६0७ मुले आणि ८२ हजार ७८७ मुलींनी परीक्षा दिली होती. यापैकी मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून ४ हजार १११ आणि राखीव कोट्यातून ३ हजार ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुढील प्रवेशासाठी जूनच्या दुसर्या आठवड्यात विद्यार्थ्यांंकडून चार केंद्रांवर प्राधान्य अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. ग्रँट मेडिकल महाविद्यालय मुंबई, बी.जे.मेडिकल महाविद्यालय पुणे, गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालय नागपूर आणि गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालय औरंगाबाद या केंद्रांवर विद्यार्थ्यांंचे प्राधान्य अर्ज भरून घेतले जाईल. याबाबतचे परिपत्रक संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांंना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी ६ ते ९ जूनपर्यंंत विभागीय अधिकार्यांकडे अर्ज करावा, असेही आवाहन केले आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १0 जून रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. तसेच ११ जूनपासून विद्यार्थ्यांंंना त्यांची गुणपत्रिका संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.
सीईटीचा ठोका अखेर अकराला!
By admin | Published: June 06, 2014 12:53 AM