मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत खुल्या गटातून सोलापूरचा विनायक गोडबोले (पीसीबी १०० पर्सेंटाइल), तर नांदेडचा आदर्श अभंगे (पीसीएम १०० पर्सेंटाइल) हा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यात प्रथम आला.
पीसीएम विषयांत खुल्या गटातून मुलांमध्ये धुळ्याचा अमन पाटील (९९. ९९८१ पर्सेंटाइल), तर मुलींमध्ये रत्नागिरीची मुग्धा पोखरणकर (९९.९९८५ पर्सेंटाइल) प्रथम आली. राखीव संवर्गातून मुलींमध्ये बीडची गीतांजली वारंगुळे (९९.९९९६ पर्सेंटाइल) हिने प्रथम येण्याचा मान मिळविला. पीसीबी विषयांत खुल्या गटात मुलींमध्ये नांदेडची ऋचा पालक्रीतवार (९९.९९८५) प्रथम आली. याच विषयांत राखीव संवर्गातून प्रथम येण्याचा मान नाशिकच्या अभिषेक घोलप (९९.९९७८ पर्सेंटाइल) याने मिळविला.
यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सीईटी परीक्षेत मराठवाड्याचे विद्यार्थी वरचढ ठरले. विशेष म्हणजे पीसीएम आणि पीसीबी या विषयांत अव्वल आलेल्या खुल्या आणि राखीव संवर्गातील मुलामुलींमध्ये पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांची पिछेहाट झाली आहे. परीक्षेसाठी राज्यातून चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एवढ्या मोठ्या संख्येने ऑनलाइन सीईटी घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.
राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १६६ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने १० दिवस १९ सत्रांमध्ये घेण्यात आली. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेची उपस्थिती ९४.९४ टक्के, तर अनुपस्थिती ५.०६ टक्के एवढी होती.
मी चांगला अभ्यास केला असल्याने मला चांगले गुण मिळतील, हे माहिती होते, पण राज्यात पीसीबी ग्रुपमध्ये पहिला येईल, याची कल्पना केली नव्हती. हे यश मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. - विनायक मुकुंद गोडबोले