मुंबई : एक आठवड्यानंतर छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर झाली आहे. अजूनही त्यांचे तपासणी अहवाल आले नाहीत. त्यामुळे सध्या सुरू असलेले उपचार त्यांच्यावर सुरू आहेत. माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना शनिवारी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हायरल फिवर आता कमी झाला आहे. पण, अजूनही त्यांच्या सांध्याची सूज गेलेली नाही तसेच त्यांच्या नाडीचे ठोकेही कमी आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतील, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. एप्रिल महिन्यातही त्यांची प्रकृती खालावली होती. त्या वेळी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. या वेळी त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळांना हृदयविकार आणि संधिवाताचा त्रास आहे. काही दिवसांत त्यांची प्रकृती सुधारल्यावरच त्यांना डिस्चार्ज देण्याची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. (प्रतिनिधी)
छगन भुजबळांची प्रकृती स्थिर
By admin | Published: September 24, 2016 4:18 AM