मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती गुरुवारी ‘जैसे थे’ राहिली. शनिवारी भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजूनही त्यांचा ताप पूर्णपणे बरा झाला नसून त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल शुक्रवारी येणार आहेत, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेल्या भुजबळ यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. कारागृहात असताना त्यांना शनिवारी ताप आला. शिवाय अंगदुखी आणि डोकेदुखीचाही त्रास होत होता. त्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हायरल फिवर झाला होता. भुजबळ यांना संधिवात असून त्यांचे सांधे सुजले आहेत. त्याचबरोबर नाडीचा वेग मंदावला होता. तपासण्यांचे अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्या औषधोपचारांत आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
छगन भुजबळ यांची प्रकृती ‘जैसे थे’
By admin | Published: September 23, 2016 4:40 AM