मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा ताप कमी झाला असला तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्यांना डिस्चार्ज कधी देता येईल, हे अद्याप निश्चित झाले नसल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकल्यानंतर छगन भुजबळ यांची रवानगी आॅर्थर रोड कारागृहात करण्यात आली. एप्रिलमध्ये भुजबळ आजारी पडल्यावर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर पाच महिन्यांनी शनिवार, १७ सप्टेंबरला भुजबळांची प्रकृती खालावली. त्यांना ताप, अंगदुखी, डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. पण, त्यांना डेंग्यू झाला नसून व्हायरल फिवर झाल्याचे निदान झाले. त्यांचा ताप आता कमी झाला आहे. पण, त्यांच्या सांध्यांना सूज आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अन्य काही तपासण्या सुरू आहेत. (प्रतिनिधी)
छगन भुजबळ यांच्या तपासण्या सुरू
By admin | Published: September 21, 2016 5:40 AM