डोंबिवली : केंद्रात, राज्यात, मुंबई महापालिकेच्या किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण नेहमीच पाहिलं आहे. मात्र, केडीएमसीतील भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर डोंबिवली शहरात शिवसेनेच्या वतीनं 'युतीचा सभापती' झाल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो बाजूबाजूला लावण्यात आल्याने शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
भाजपाचे जेष्ठ नगरसेवक राहुल दामले केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती झाल्यानंतर डोंबिवलीत शिवसेनेच्या दिगग्ज नेत्यांनी मोठी बॅनरबाजी केली आहे. यात 'युतीचा सभापती' हे ठळकपणे नमूद करण्यात आलंय. कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी बॅनरमध्ये युतीचा सभापती असा उल्लेख केला आहे. तर शिवसेनेचे केडीएमसीतील सभागृह नेते राजेश मोरे यांनी 'युती तर्फे हार्दिक अभिनंदन' असं बॅनरवर म्हटलं आहे. तर सेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या बॅनरवर चक्क 'युतीचे सहकारी' असा उल्लेख केला आहे. गेल्या ३ वर्षांत केडीएमसीमध्ये शिवसेना भाजपाची युती असली, तरी दोन्हीकडील नगरसेवक आणि पदाधिका-यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडण्यात आलेली नाही. आता मात्र अचानक असं काय झालं? की सेनेला युती आठवली? अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
बॅनरबाजीबाबत बोलताना शिवसेनेनं मात्र सावध भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपला स्थायी समितीचं सभापतीपद देण्याचा शब्द दिला होता. तो आम्ही पाळला असून यापुढे भाजपनेही तो पाळावा, असा अपेक्षावजा इशारा शिवसेनेचे केडीएमसीतील सभागृह नेते राजेश मोरे यांनी दिलाय.
मनसेने शिवसेना भाजपा गुजरात निवडणुकीनंतर धास्तावल्याचं म्हटलं आहे. शिवाय येत्या काळात केडीएमसीत मोठा निधी येणार असून त्यावरून श्रेयवाद आगामी काळात रंगेलच, तेव्हा युतीधर्म आठवतो का? हे कळेलच असा टोलाही त्यांनी लगावलाय. शिवाय डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना एक पर्याय म्हणून शिवसेना राहुल दामले यांना लॉन्च करतेय का? - मंदार हळबे, विरोधी पक्षनेते, मनसे.
या सर्व प्रतिक्रियांवर भाजपने मात्र शिवसेनेला चिमटा काढलाय. शहराचा विकास करायचा असेल, तर खांद्याला खांदा लावूनच काम करावं लागेल, असं म्हणत मागील वेळेस शिवसेनेचा सभापती झाला, तोदेखील युतीचाच होता, अशी आठवण भाजपचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी करून दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात बॅनरवरील ही युती प्रत्यक्षातही टिकून राहील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.