मुंबई : एसटीच्या चालक, वाहक व यांत्रिकी कामगारांचा असलेला गणवेश बदलण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेकडून एसटी कामगारांच्या गणवेशाचे डिझाईनवर काम सुरू आहे. यासाठी कामगारांची मते जाणून घेण्यात येत असून, बहुतांश चालक-वाहकांनी खाकी तर यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी निळ्या रंगालाच पसंती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गणवेशाचा रंग तोच राहणार असून, त्याला थोडा नवा लूक देण्यात येईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. आॅक्टोबरपर्यंत नवा गणवेश येईल. कर्मचाऱ्यांच्या गणवेशाला नवा लूक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची रंगसंगती कशी असावी, एसटीचा बॅच किंवा लोगो कुठे असावा यासाठी राज्यातील एसटी आगारातील चालक, वाहक तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्यात येत आहे. यासंदर्भात नुकतीच एसटीच्या कामगार युनियनसोबत नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेकडून गणवेशाचे सादरीकरण करण्यात आले. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या गणवेशांचे सादरीकरण करण्यात आले. यात चालक-वाहकांचा रंग खाकी असावा परंतु तो पोलिसांच्या खाकीपेक्षा वेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात एसटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक-वाहकांचे मत अजूनही जाणून घेण्यात येत आहे. हे काम सुरू असून, आॅक्टोबरपर्यंत नवा गणवेश चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागांना मिळेल. सध्या एसी शिवनेरी चालकांचा गणवेश सफेद रंगाचा असून त्यांच्या गणवेशाबाबतही सर्वेक्षण होत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांची मोठी संख्याएसटीत जवळपास ३६ हजार चालक असून, तेवढ्याच प्रमाणात वाहकही आहेत. तर यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्वांचा गणवेश वर्षानुवर्षे तोच असून, त्याला नवा लूक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पसंती खाकीला, मात्र वाहक, चालकांना मिळणार नवा लूक
By admin | Published: July 27, 2016 2:33 AM