ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 6 - चाकण परिसरातील गावांमध्ये आता नागरिकांना अचानक बिबट्याचे भरलोकवस्तीत दर्शन होत असल्याचे चित्र दिसत असून, वन विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मागील आठवडाभरात चाकण परिसरातील कोरेगाव, कुरकुंडी, बोरदरा, गोणवडी, झित्राईमळा व खराबवाडी परिसरात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चाकण परिसरात मागील वर्षी ३० ऑगस्ट २०१५ रोजी सांगुर्डी जवळ इंदुरी गावच्या हद्दीत तोलानी इन्स्टिट्यूट मध्ये बिबट्या आढळला. २ सप्टेंबर २०१५ रोजी बिबट्याने सांगुर्डी परिसरात पाच कुत्री फस्त करून १२ जानेवारी २०१६ रोजी सांगुर्डी येथील धनगर वाड्यातील आबा कऱ्हे यांचे एक शिंगरू व तीन मेंढ्या फस्त केल्या होत्या. त्या भागात पिंजरा लावूनही बिबट्या मिळाला नव्हता.
गुरुवार दि. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडीतील महादेवी मंदिराजवळील ओढ्यात गेलेल्या कंटेनरचा अपघात पाहताना नागरिकांनी बिबट्या ओढ्यातून पळताना पाहिला. त्यानंतर मागील आठवड्यात आंबेठाण रस्त्यावरील भामा पेट्रोल पंपाच्या आवारात पहाटेच्या सुमारास बिबट्या आल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर १ नोव्हेंबर २०१६ रोजी गोणवडी-बोरदरा ओढ्यात बिबट्या आढळल्याचे माजी सरपंच दिनेश मोहिते यांनी सांगितले. मागील चार दिवसापासून हा बिबट्या कोरेगाव-कुरकुंडी रस्त्यावर आढळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात ऊसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याला दडायला जागा मिळत आहे. त्या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चाकणचे वनाधिकारी के एन साबळे हे भरती प्रक्रियेसाठी गेल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
https://www.dailymotion.com/video/x844h3c