- ऑनलाइन लोकमत
पीएसआय श्रीधर जगताप व पथकाला पोलीस अधीक्षकांचे दहा हजाराचे बक्षीस जाहीर
ए टी एम मशीन फोडण्याच्या तयारीत होते दरोडेखोर
चाकण, दि. 3 - जीव धोक्यात घालून चाकण पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ३ दरोडेखोरांना जेरबंद केल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप व त्यांच्या पथकाला दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, मागील चार दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने भोसे येथे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचालकाला हटकले असता आरोपींनी गाडी वेगाने चालू करून पसार झाले. त्यांच्यामागे सरकारी बोलेरो गाडीतून पोलीस पथकाने आळंदी फाट्यापर्यंत पाठलाग केला, परंतु स्पायसर चौकाजवळ दोन गाड्यांच्या मध्ये मोठे अंतर पडल्याने आरोपी फरार झाले.
त्यानंतर गुरुवारी ( दि. १ ) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा तीच काळ्या रंगाची व बम्परला सिल्व्हर रंग असलेली स्कॉर्पिओ तळेगाव चौकात उभी असताना रात्रीच्या गस्तीवरील पोलीस अशोक साळुंके यांनी त्यांना हटकले असता आरोपींनी गाडीसह पळ काढला. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी अलर्ट होऊन पोलीस शेखर हगवणे, अशोक साळुंके, राऊत व दोन पोलीस मित्रांना घेऊन सरकारी गाडीतून सिने स्टाईल पाठलाग सुरु केला. आरोपी मुंबईकडे पळून जात असताना तळेगाव पोलिसांना अलर्ट करण्यात आले. आरोपी पुन्हा मागे फिरले. चाकण पोलिसांनी भंडारा डोंगराजवळील बंद पडलेला टोलनाक्यावर नाकाबंदी केली. आरोपी १२० च्या स्पीडने पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी एम आय डी सी ती ल हॉटेल मॅरिएट चौकात नाकाबंदी केली. नाकाबंदी पाहून आरोपी १०० मीटर मागे वळाले व पुन्हा १२० च्या स्पीडने मागे फिरले. परंतु गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जागेवर गोल फिरून बंद पडली. हे दरोडेखोर ए टी एम दरोड्यातील असल्याने पी एस आय श्रीधर जगताप यांनी सावधानता बाळगून आरोपींवर पिस्तोल रोखले व आरोपींना काचा फोडून गाडीतून बाहेर काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
राजेश भगवान पवार ( वय ३६, रा. माझेरी, ता. महाड, जि. रायगड ), राजेश आवळे ( वय ३७, रा. कोपरखैरणे ), मोहम्मद जाफर खावेन ( वय २९, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कामगिरीमुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी चाकण पोलीस पथकाला दहा हजाराचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.