संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आरोग्य क्षेत्रात संशोधनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथमच सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च अटोनॉमी (सीएचएकेआरए-चक्र) नावाची कंपनी स्थापना केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला संशोधनासाठी अन्य संशोधन संस्थांमार्फत करार करणे सोपे होणार आहे. तसेच या कंपनीत सामाजिक दायित्वाचा निधी या कंपनीत घेणे सोपे होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन वाढावे, तसेच काही दुर्मीळ आजारांवरील उपचाराची पद्धती विकसित व्हावी, याकरिता ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ विविध कॉलेजमध्ये निर्माण केली जाणार आहेत. ही व्यवस्था ‘हब अँड स्पोक’च्या धर्तीवर राबविली जाणार आहे. यामध्ये मुख्य केंद्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असणार आहे. या विद्यापीठातून प्रत्येक महाविद्यालयाला एक विषय देण्यात येईल. त्यावर महाविद्यालयाने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अन्य महाविद्यालयांना समाविष्ट करून घेणे अपेक्षित आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यापूर्वीच यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, त्याचे मुख्यालय नाशिक येथील विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणाहून अन्य महाविद्यालयांशी समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमासाठी सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च अटोनॉमी (सीएचएकेआरए - चक्र ) नावाची कंपनी स्थापन करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच या कंपनीच्या अध्यक्ष पदावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव असणार आहेत. त्यासोबत संचालक पदावर वैद्यकीय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक राहण्यासाठी विभागाने मान्यता दिली आहे.
कोणत्या कॉलेजला कोणता विषय? ससून रुग्णालयाला माता आणि बाळ हा विषय असून, त्यासाठी जेनेटिक सेंटर लॅबची मदत घेता येणार आहे.छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिरयाट्रिक आणि सार्वजनिक नेत्रविकार विषयात काम करणार आहेत. विद्यापीठाच्या ऐरोली येथील केंद्रामध्ये मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयाने दंतरोग या विषयावर काम करणे अपेक्षित आहे.कस्तुरबा रुग्णालयात विद्यापीठाचे साथरोग विषयातील अध्यासन केंद्र आहे. त्या ठिकाणी साथरोग शास्त्रावर संशोधन करण्यात येणार आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि एम्स हे आदिवासी आरोग्य या विषयावर काम करणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील संशोधनास या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे. राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विविध विषयांचे संशोधन होईल. याचा फायदा उपचार पद्धतीमध्ये होणार आहे. राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग
हा उपक्रम सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच विद्यापीठ परिसरातील इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीची चक्र या सेक्शन ८ कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे संशोधन संस्थांसाठी करार करणे सोपे होणार आहे. विद्यापीठात त्याचे मुख्य केंद्र असणार आहे. डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ