महाड/माणगाव : गणेश चतुर्थीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही वाहतूककोंडी आणि जोरदार पावासाने ‘विघ्न’ आणले आहे. कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक आणि मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे कोकणातले चाकरमानी वाहतूककोंडीच्या कचाट्यात सापडले आहेत.
गणेश विसर्जन झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपासूनच चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूककोंडीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मुंबई ते महाडपर्यंतच्या प्रवासाला तब्बल १६ ते १७ तास लागले होते. रविवारीही त्याची पुनरावृत्ती झालेली दिसून आली.
शनिवारी मध्यरात्री महाडपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा रविवारी दुपारनंतर वाढतच गेल्या. कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेला तुळशी खिंडमार्ग खचल्याने, हा मार्ग गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोंडीत आणखीनच भर पडली.
चौपदरीकरणामुळे मंदावली गतीमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे (इंदापूर ते कशेडी घाट) काम माणगाव तालुक्यातील इंदापूर ते वडपाले दरम्यान सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच माणगाव शहरातून, तसेच लोणेरे, महाड येथूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली.ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने पर्यायी मार्ग खुले करून दिल्याने वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, तसेच माणगाव, लोणेरे व इंदापूर शहरातून दुभाजकाचा वापर केल्याने वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली.