मुंबई : जमैत - ए - इस्लामी हिंदची महिला इस्लामिक संस्था (जीआयओ) मुलींना केवळ धर्माचे ज्ञान देत नाही, तर मुलींचा ब्रेनवॉश करून त्यांना जिहादचे प्रशिक्षण देत असल्याचे पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी काढलेल्या परिपत्रकात म्हटले होते. या परिपत्रकाला जमैत-ए-इस्लामी हिंदने हायकोर्टात आव्हान दिले आहे. तरुण मुलींच्या फायद्यासाठीच जीआयओची स्थापना करण्यात आल्याचे संस्थेने याचिकेत म्हटले आहे. ‘परिपत्रकाद्वारे जमैतची बदनामी करण्यात आली आहे, तसेच प्रतिमाही खराब करण्यात आली आहे. हे परिपत्रक कशाच्या आधारे काढण्यात आले आहे? त्यास कोण जबाबदार आहे? याची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी जमैतने याचिकेद्वारे केली आहे. संस्थेसंदर्भात परिपत्रक काढण्यापूर्वी त्यातील माहिती पडताळणी करण्याकरिता मागदर्शक तत्त्वे असावीत. बदनामी करून प्रतिमा खराब केल्याबद्दल सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.पोलिसांनी आपल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले आहे. परिपत्रकाद्वारे बदनामी केली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेत राज्य सरकारसह, पोलीस आयुक्त, गृहखात्याचे प्रधान सचिव आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या परिपत्रकातील मुद्दे प्रसारमाध्यामांपर्यंत पोहोचले कसे? अशी विचारणा उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केली. हे परिपत्रक पोलिसांकडून प्रसारमाध्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे पोलीस विभागाने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला सांगितले. प्रसारमाध्यामंपर्यंत परिपत्रक कसे पोहोचले, हे शोधणे कठीण आहे, असेही पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकाला आव्हान
By admin | Published: March 22, 2016 3:37 AM