मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वीच माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याने सिल्लोड मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलले आहेत. त्यामुळे सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या सिल्लोड मतदारसंघात यावेळी काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या सत्तारांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर नुकतेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघात काँग्रेसला याचा मोठा नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. सत्तार हे या मतदारसंघातून २००९-२०१४ ला सलग दोनवेळा निवडून आले असून, तिसऱ्यांदा ते पुन्हा रिंगणात असणार आहे.
सिल्लोड मतदारसंघात सत्तार दोनवेळा निवडून आले म्हणजेच काँग्रेस पक्षाला दोनवेळा विजय मिळवता आल्याचे चित्र होते. मात्र आता सत्तार सेनेत गेले असल्याने सिल्लोड मतदारसंघातून सत्तारांना आमदारकीची तर काँग्रेसला विजयाची हॅटट्रिक करण्याचे आव्हान असल्याचे बोलले जाता आहे. त्यामुळे सत्तार आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी जोरदार तयारी केली असून, मतदारांच्या भेटीगाठी सुद्धा सुरु केल्या आहेत.
सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. तर सत्तार यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रभाकर पालोदकर यांना उमदेवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी सुद्धा या मतदारसंघावर दावा करत आहे. मात्र असे असले तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीपैकी ज्याला कुणाला जागा सुटेल त्याचे काम दुसऱ्या पक्षाने करावे असे, दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये ठरले आहे. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा आहे.