मलकापुरात भाजपला सुरुंग लावण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 04:58 PM2019-08-03T16:58:58+5:302019-08-03T17:12:21+5:30
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरचे विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या तीन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघात राजकीय वातावरण तापत आहे. तर विद्यामान आमदारांना रोखण्यासाठी विरोधकांनी मतदारसंघ पिंजून काढणे सुरु केले आहे. मलकापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येणारे व विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांचा विजयाचा रथ रोखणे काँग्रेस समोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आमदार संचेती सहाव्यांदा विजयाची मालिका कायम ठेवणार का ? अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरचे विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे. १९९५ पासून आजपर्यंत संचेती यांनी मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठेवले आहे. पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी नंतर भाजपच्या तिकीटावर कायम निवडणूक लढवत विजयाची मालिका कायम ठेवली. काँग्रेसने प्रत्येकवेळी नवीन चेहरा देऊन संचेती यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नाही विशेष.
लोकसभा निवडणुकीत मलकापूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी ६० हजार ४९६ चे मताधिक्य मिळवले होते. त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणे काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यातच, पक्षातून उमेदवारीसाठी डझनभर इच्छुकांचे अर्ज आले आहेत. इच्छुकांची यादी लक्षात घेत सक्षम उमेदवार निवडणे काँग्रेसाठी अडचणीचे ठरत आहे.
भाजपकडून संचेती यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तर, काँग्रेसकडून नगराध्यक्ष हरीश रावळ, राजेश इकडे, अरविंद कोलते यांच्या नावांची चर्चा आहे. जर आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला तर संतोष रायपुरे तर जळगाव जामोद मतदार संघातून संगीतराव भोंगळ उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे. मात्र असे असली तरीही, संचेती यांचा मतदारसंघात असलेली लोकप्रियता पाहता, त्यांच्या विजयाचा रथ रोखणे विरोधकांसमोर आव्हान ठरणार आहे.