मुंबई : महत्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पाच्या वाटेतील एक-एक अडचण दूर होत आहे. गेली काही वर्षे सरकारी लालफितीत अडकलेला हा प्रकल्प महापालिका निवडणुकीत प्रचाराचा मोठा सेतू ठरु शकतो. त्यामुळे सागरी सेतूच्या मार्गातील सर्व सरकारी अडथळे मार्गी लावण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार या प्रकल्पाचा पाया रचण्यासाठी भूतांत्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने आचारसंहितेपूर्वी हे काम पूर्ण करुन घेण्याचे आव्हान भाजपापुढे आहे.२०१२ मध्ये नरीमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत सागरी सेतू तयार करण्याचा प्रस्ताव तयार झाला. मात्र महापालिकेची दुसरी निवडणूक येऊन ठेपली, तरी या प्रकल्पाचा बार अद्याप उडविण्यात आलेला नाही. या प्रकल्पाचे काम निवडणुकीपूर्वी सुरू करण्यासाठी शिवसेना-भाजपा युतीचे एकत्रित प्रयत्न सुरू होते. मात्र आता या मैत्रीमध्येच फूट पडल्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे या प्रकल्पासाठी बळ लावत आहेत. विशेष म्हणजे राज्यात सत्तेवर आल्याने भाजपाने हा प्रकल्प आपल्याकडे खेचून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. त्यानुसार गेल्या महिन्याभरात एका पाठोपाठ एक असे अनेक सरकारी परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र या प्रकल्पाला मिळाली आहेत. त्यामुळे हा सेतू बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोगद्याच्या मार्गावर प्रत्येक शंभर मीटरवर एकूण १६६ कुपछिद्रे पाडण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी हे महत्वाचे असून तीन महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी २०१७ पर्यंत हे काम मार्गी लागेल. परंतु तत्पूर्वी आचारसंहिता जाहीर झाल्यास भाजपाची गोची होणार आहे. (प्रतिनिधी)हे अडथळे पारया सर्वेक्षणासाठी आवश्यक परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र पालिकेला नुकत्याच मिळाल्या आहेत. यामध्ये उच्च स्तरीय समिती, महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए), भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या परवानगींचा समावेश आहे.३३ कि़मी. चा प्रस्तावित सागरी सेतू प्रत्यक्षात आता २९.२२ कि़मी. असणार आहे. मरीन ड्राईव्ह ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवली असा हा सागरी मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी दक्षिण मुंबई ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत ९.९८ कि़मी. च्या पट्ट्यावर भूतांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील या कामासाठी आठ कोटी ४३ लाख रुपये खर्च होणार आहेत.
निवडणुकीचा सागरी सेतू पार करण्याचे आव्हान
By admin | Published: October 23, 2016 1:51 AM