राकेश घानोडे, नागपूरविधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेश काशीवार व रामचंद्र अवसरे या विदर्भातील नऊ आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी सुनील केदार हे काँग्रेसचे तर, उर्वरित सर्व भाजपाचे आमदार आहेत.मतदार अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किशोर गजभिये यांनी डॉ. मिलिंद माने, आॅल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांनी कीर्तीकुमार भांगडिया, शरीफ खा वझीर खा यांच्यासह सात मतदारांनी राजू तोडसाम, भाजपाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी सुनील केदार, शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उमेदवार सेवकभाऊ वाघाये यांनी राजेश काशीवार तर, रणजित चव्हाण यांनी रामचंद्र अवसरे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. या आमदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांची निवडणूक रद्द करून संबंधित मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. न्यायालयाने संबंधित आमदार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.निवडणूक याचिकेवर सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून विशेष न्यायपीठाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, डॉ. मिलिंद माने व मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे, डॉ. देवराव होळी व राजू तोडसाम यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती झेड.ए. हक, कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर तर, रामचंद्र अवसरे व राजेश काशीवार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले आहे.केदार यांच्यासाठी नवे न्यायपीठसुनील केदार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते. परंतु, न्यायमूर्ती देशपांडे यांनी काही कारणास्तव ही याचिका ‘नॉट बिफोर मी’ केली. यामुळे याचिकेसाठी नवीन न्यायपीठ स्थापन होणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांच्या निवडणुकीला आव्हान
By admin | Published: June 17, 2015 3:38 AM