नवी मुंबई : फायनान्स कंपनीवर दरोडा टाकून २३ किलो सोने लुटणाऱ्या नाडर टोळीच्या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्याकडून लुटीच्या २३ किलो सोन्यापैकी सुमारे एक किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. टोळीतील काही आरोपी अद्यापही फरार आहेत.सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीच्या शाखेवर ६ आॅगस्ट रोजी भरदुपारी दरोड्याची घटना घडली. घटनेत दरोडेखोरांनी २३ किलो सोने व ९ लाख ५० हजार रुपयांची रक्कम असा एकूण ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेलेला आहे. दरोड्यावेळी त्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील काढून नेला होता. अनेक प्रयत्नानंतर दरोडेखोरांची ओळख पटल्यानंतर नवी मुंबई पोलीस त्यांच्या मागावर असतानाच मुंबई पोलिसांनी अप्पू नाडार (३८) याला अटक करुन नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इकबाल पठाण ऊर्फ पप्पू (४७) व सुब्रम्हण्यम तेवर ऊर्फ मनी या दोघा साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केलेली आहे. त्यांच्याकडून अवघे १ किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले आहे.दरोड्याच्या गुन्ह्यात नाडर टोळी सराईत असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वी १६ हून अधिक गुन्हे केलेले आहेत. दरोडा टाकताना पाठीमागे कसलाही पुरावा राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतलेली होती. त्यामुळे दरोड्याचा कट रचला कसा याचाही अद्याप पूर्णपणे उलगडा होवू शकलेला नाही. गुन्ह्याच्या मुळाशी पोचण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासावर देखील भर दिला होता. परंतु सीवूड दरोडा प्रकरणात टोळीच्या खबरदारीमुळे तपासात पोलिसांच्या हाती अपेक्षित सुगावे लागलेले नाहीत. (प्रतिनिधी)
नाडर टोळीचे पोलिसांपुढे आव्हान
By admin | Published: September 19, 2016 1:50 AM