मुंबई : नाटक, तमाशाच्या संहितांना पूर्व-मंजुरी घेणे महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण महामंडळाने बंधनकारक केले असून त्याला ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते अमोल पालेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. महामंडळाच्या निर्णयामुळे कलात्मक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे पालेकरांचे म्हणणे आहे.बॉम्बे पोलीस कायद्याचे कलम ३३ (१) (डब्ल्यूए) अंतर्गत पोलीस आयुक्त व पोलीस महाअधीक्षक यांना करमणुकीच्या सार्वजनिक जागांवर (चित्रपटगृहाव्यतिरिक्त) नाटक, तमाशा, जत्रा इत्यादींना परवाना देण्यासाठी मागदर्शकतत्वे आखण्याचे व या ठिकाणांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.या कायद्यातील नियमांतर्गत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी नाटकाची संहिता महामंडळापुढे सादर करून पूर्व-मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या नियमामुळे कलात्मक स्वातंत्र्यावर गदा आली असून अनेक ऐतिहासिक नाटके त्यांच्या मूळ स्वरुपात सादर करणे कठीण झाले आहे. हा नियम मनमानी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असे पालेकर यांनी याचिकेत म्हटले आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी एक आठवड्यासाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)
नाट्यसंहितांच्या पूर्वमंजुरीस आव्हान
By admin | Published: September 20, 2016 4:41 AM