जगातील सर्वांत लांब विषारी सर्प - नागराजजगातील सर्वांत लहान विषारी सर्प - फुरसेजगातील सर्वांत लहान बिनविषारी सर्प - वाळा सर्पजगातील सर्वांत लांब बिनविषारी सर्प - जाळीदार अजगरहे चारही सर्प भारताच्या सरिसृप विविधतेचे प्रतिनिधी आहेत. जगातील एकूण ३००० सर्प प्रजातींपैकी अंदाजे ३५० सर्प प्रजाती भारतात आढळतात. यापैकी किमान ५० प्रजाती गेल्या २० वर्षांत नव्याने शोधल्या गेल्या आहेत. सरडे आणि पाली यांच्या ५० पेक्षा जास्त नवीन प्रजाती गेल्या १० वर्षांत सापडल्या आहेत. उभयचर म्हणजेच बेडूकवर्गीय प्राण्यांच्या भारतात अंदाजे ४०० प्रजाती आढळतात. यापैकी २०० हून अधिक प्रजाती गेल्या २५ वर्षांत शोधल्या गेल्या आहेत. म्हणजेच भारतात सरिसृप आणि उभयचर यांचा शास्त्रीय अभ्यास तसा इतर शाखांच्या तुलनेत उशिरा सुरू झाला.सरिसृप आणि उभयचर प्रांतातील ही प्रचंड विविधता भारतभर सर्वत्र समान विखुरलेली नाही. पश्चिम घाटाचा दक्षिण भाग, ईशान्य भारत आणि सागरी बेटांवर या विविधतेचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. यापैकी अनेक प्रजाती प्रदेशनिष्ठ म्हणजेच केवळ ठराविक प्रदेशातच आढळणाऱ्या आहेत. या प्रदेशातील विशिष्ट वातावरणात जगण्यासाठी हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमधून या प्रजाती उदयास आल्या आहेत. त्यामुळेच अशा ठिकाणी होणारा अगदी छोटा बदलदेखील काही प्रजातींच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकतो. मुंबई-पुणे महामार्गावरील केवळ खंडाळा परिसरात आढळणारी एक प्रकारची ‘खापरखवल्या’ आणि ‘पवळा सर्पा’ची एक उपजात द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यापासून पाहण्यात आलेली नाही. यावरून प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संवेदनशीलतेची जाणीव व्हावी.साप आणि बेडकांच्या अनेक प्रजाती मानवी वस्तींसोबत राहण्यासाठीच उत्क्रांत झाल्या आहेत. धामण, नाग यासारखे सर्प मुख्यत: मानवी वस्ती आणि शेताच्या परिसरातच आढळतात. उंदीर नियंत्रणातील त्यांच्या सहभागामुळेच त्यांना ‘शेतकºयांचा मित्र’ म्हटले गेले. पूर्वी घराच्या आसपास रिकाम्या जागेतील नैसर्गिक उथळ खाचखळग्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साठून त्यामध्ये बेडकांचा वंश वाढत होता. हे बेडूक शेतातील कीड, तसेच मानवी वस्तीतील डास नियंत्रित करीत असत. सपाटीकरण, तसेच सर्वत्र काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक यांच्या अट्टहासामुळे शहरातील बेडूक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळेदेखील बेडकांची संख्या कमी होत आहे.काळाच्या ओघात वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीवांना शहरातून हद्दपार करण्यासाठी दबाव वाढत आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये निसर्गाचा अभ्यास दुय्यम झाल्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील दरी आणि संघर्ष वाढत आहे. त्यातल्या त्यात साप मारण्याऐवजी सर्पमित्रांकडून ते पकडून दूर सोडण्याकडे कल वाढला आहे. तथापि, साप सोडण्याच्या अशास्त्रीय पद्धती, त्यांच्या जीवनशैलीविषयक अभ्यासाची उणीव आणि अधिवासातील हस्तक्षेप यामुळे यातील किती साप प्रत्यक्षात जगतात हा अभ्यासाचा विषय आहे. ज्याप्रमाणे पाली, सरडे किंवा चिमण्या आपल्या अंगणात राहू शकतात, तसेच सापही या परिसराचा भाग आहे, याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. किमान बिनविषारी साप न पकडता आहे तेथेच राहू देणे यासाठी काम करण्याची जबाबदारी सर्पमित्रांनी घेणे गरजेचे आहे.प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ यामुळे सरिसृप आणि उभयचर यांच्या नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेमधील बदल सरिसृपांच्या संवर्धनातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आययूसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार भारतातील बेडकांच्या सुमारे ५७ टक्के प्रजाती संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. समुद्री कासव आणि काही प्रकारच्या बेडकांमध्ये जन्माला येणारी नवीन पिढी ही फक्त नर अथवा फक्त मादी अशा एकाच लिंगाची असल्याने त्यांच्यातील नैसर्गिक लिंग गुणोत्तर बदलत असल्याचे आढळले आहे.भारतातील अन्नधान्य उत्पादनातील अंदाजे २३ टक्के उत्पन्न उंदीर आणि कीड यामुळे नष्ट होते. साप आणि बेडूक नैसर्गिकरीत्या यांच्यावर नियंत्रण ठेवत असल्याने त्यांची घटती संख्या मानवासाठी निश्चितच त्रासदायक ठरू शकते.- दीपक सावंत, संचालकनिसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, चिंचवड, पुणे
Bio Diversity Day : शेतकऱ्यांच्या 'या' मित्रांना वाचवायला हवं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:34 AM