कल्याण : आमदारांच्या वेतनवाढीविरोधात उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते व वास्तुविशारद संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. लवकरच सुनावणी अपेक्षित आहे, असे पाटील यांनी सांगितले.राज्यावर तीन लाख ७९ हजार कोटींचे कर्ज आहे. अशा स्थितीत आमदारांच्या वेतनात दुप्पट वाढ झाली आहे. माजी आमदारांचे निवृत्ती वेतन १० हजारांनी वाढले आहे. निवृत्ती वेतनातही तीन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. विषयपत्रिकेवर वेतनवाढीचा विषय नसताना, तो विषय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो तातडीने मंजूर का करण्यात आला, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. आयत्या वेळी विषय मंजूर करण्यासाठी विधान परिषदेतील पाच सदस्य व विधानसभेतील १५ सदस्यांची अनुमती लागते. त्याला फाटा देण्यात आला. अर्थसंकल्पात तरतूद नसताना, वेतनवाढ दिली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी ६६ कोटींचा बोजा पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही. १,६२२ शिक्षकांना पेन्शन मिळालेली नाही. विधिमंडळाकडे त्यांचा विषय मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशा स्थितीत वेतनवाढ का दिली गेली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आमदारांच्या वेतनवाढीला उच्च न्यायालयात आव्हान
By admin | Published: September 01, 2016 5:35 AM