मुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्याआधीच आठ महिने कारागृहातून सूटका होणार आहे. गुरुवारी त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहातून सोडण्यात येणार आहे. मात्र त्याच्या या सुटकेला एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. संजय दत्तने असे कोणते काम केले, की त्यावरून त्याची शिक्षा माफ करण्याचा निर्णय सरकार व तुरुंग प्रशासनाने घेतला, असा प्रश्न या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेवर गुरुवारीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.संजय दत्तला शिक्षेत देण्यात आलेली आठ महिन्यांची सूट रद्द करण्यात यावी. संपूर्ण शिक्षा भोगण्यासाठी त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.संजय दत्त याचे कारागृहातील वर्तन नीट असल्याने त्याची आठ महिन्यांची शिक्षा माफ करण्यात आल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. ‘संजय दत्तला बेकायदेशीरपणे शिक्षेत माफी देण्यात आली आहे. संजय दत्तने असे कोणते चांगले वर्तन केले आहे की त्याला आठ महिन्यांची शिक्षा माफ करण्यात आली? जे किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगात गेले आहेत, त्यांचे काय? त्यांनीही शिक्षेत सूट देण्यात यावी, यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांच्या अर्जावर निर्णय घेण्यात आला नाही,’ असे भालेराव यांनी याचिकेत म्हटले आहे.१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६ मे २०१३ रोजी संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यापैकी त्याने खटल्यादरम्यान दीड वर्षांची शिक्षा आधीच भोगली होती. त्यामुळे त्याला मे २०१३ पासून साडेतीन वर्षांची शिक्षा पूर्ण करायची होती. ही शिक्षा आॅक्टोबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र त्याआधीच संजय दत्तची कारागृहातून सुटका होणार आहे. (प्रतिनिधी)सुटकेचे गणितकैद्याच्या वर्तवणुकीनुसार महिन्याला सात दिवस शिक्षा कमी होऊ शकते. अशी वर्षाला ८४ दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते.कैद्याचे वर्तन उत्तम असेल तर अतिरिक्त ३० दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. या हिशेबानुसार संजय दत्तची वर्षातील ११४ दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. जेल अधीक्षकांना कोणत्याही कैद्याची ३० दिवसांची, पोलीस उपमहानिरीक्षकांना ६० दिवसांची, तर पोलीस महासंचालकांना ९० दिवसांची सुटी माफ करण्याचे अधिकार आहेत.
सुटकेला आव्हान; हायकोर्टात याचिका
By admin | Published: February 25, 2016 12:51 AM