५३६ उमेदवारांची माघार : माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, नामदेव उसेंडी, अनिल बावनकर यांच्या तलवारी म्याननागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना युती मोडीत निघाल्यानंतर त्यांच्यापुढे बंडोबाचा थंडोबा करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. काही जिल्ह्यांमध्ये पक्षांना बंडखोरीचे तण उपटून टाकण्यात यश आले असले तरी दबंग बंडखोर नेत्यांच्या भुलथापांना बळी पडले नाहीत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात बंडखोरीचे पीक उफाळून आले आहे. त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.नागपूर जिल्हानागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात एकूण ३१२ उमेदवारी अर्ज आले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी ७० जणांनी माघार घेतल्याने आता २०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. ग्रामीणमध्ये काटोल मतदार संघात सर्वाधिक १८, हिंगणा १७, कामठी १४, रामटेक तर १४ सावनेर व उमरेड मतदारसंघातून प्रत्येकी १५ उमेदवार निवडणूक लढवत आहे. नागपूर शहरातील दक्षिण नागपूर १८, मध्य नागपूर व पूर्व नागपूर प्रत्येकी २०, दक्षिण-पश्चिम १६ ,उत्तर नागपूर १९ तर पश्चिम नागपुरातून १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावती जिल्हाअमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे एकूण १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. अमरावतीमधून १२ जणांची माघार तर २० उमेदवार कायम, मेळघाट दोन माघार, सहा रिंगणात, मोर्शीतून चार उमेदवारांची माघार, १९ रिंगणात, दर्यापुरातून नऊ उमेदवारांची माघार तर १९ कायम, धामणगाव रेल्वेतून ११ जणांनी माघार, १९ रिंगणात, तिवस्यातून १२ उमेदवारांची माघार तर १८ रिंगणात, अचलपूरमध्ये ७ जणांची माघार, १९ रिंगणात आणि बडनेरा मतदारसंघातून १० उमेदवारांनी माघार घेतली असून १५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.अकोला जिल्हाअकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून ६६ उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे हे एकमेव सर्वपरिचित उमेदवार आहेत. आता पाच मतदारसंघांमध्ये एकूण ९३ उमेदवार रिंगणात आहेत. आकोटमधून १२ उमेदवारांनी माघार, १८ रिंगणात, मूर्तिजापूरमध्ये ११ माघार, १९ रिंगणात, अकोला पश्चिममधून नऊ माघार, १५ रिंगणात, अकोला पूर्वमधून नऊ माघार, २५ रिंगणात, बाळापूरमधून २५ माघार तर १६ उमेदवार रिंगणात आहेत. अकोला पश्चिममधून सपाचे काझी नाझिमोद्दीन यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. वर्धा जिल्हाआर्वीतून तीन, देवळी सात आणि वर्धेतून सहा अशा १६ जणांनी आपले नामांकन परत घेतले आहे. आता ६९ उमेदवार रिंगणात आमने-सामने आहेत. आर्वीत १५, देवळी १९, हिंगणघाट १४, तर वर्धेत २१ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहे.चंद्रपूर जिल्हाचंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातून एकूण ४५ उमेदवारांनी नामांकन अर्ज परत घेतले. त्यामुळे आता १०७ उमेदवार रिंगणात आहेत. चंद्रपूर क्षेत्रात एकूण आठ माघार, १३ रिंगणात, बल्लारपूर तीन माघार, १५ रिंगणात, ब्रह्मपुरी पाच माघार, १५ मैदानात, चिमूर १३ माघार, राजुरा तीन माघार, १६ रिंगणात आणि वरोरामध्ये १३ उमेदवारांनी नामांकन परत घेतले. यात काँग्रेसचे विजय देवतळे व भाजपाचे ओम मांडवकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. या संघात आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात आता ३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. १२ उमेदवारांनी आपले नामांकन पत्र मागे घेतले आहे. नामांकन पत्र मागे घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये गडचिरोली विद्यमान काँग्रेस आमदार डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी यांचा समावेश आहे. त्यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अहेरी विधानसभा क्षेत्रातून एक, गडचिरोली क्षेत्रातून ७ तर आरमोरी क्षेत्रातून ४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. गडचिरोली व आरमोरी या विधानसभा क्षेत्रात प्रमुख चार पक्षांमध्ये चौरंगी लढत होईल, असे चित्र आहे. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात मात्र भाजप, राकाँ व अपक्ष दीपक आत्राम यांच्यातच सामना आहे. यवतमाळ जिल्हाजिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातून ७४ जणांनी माघार घेतल्याने आता १०३ उमेदवार रिंगणात आहे. सर्वच ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. यवतमाळमधून माजीमंत्री राजाभाऊ ठाकरे, राजेंद्र उत्तमराव पाटील यांच्यासह आर्णीतून भाजपाचे उद्धवराव येरमे आणि उमरखेडमधून हरीश पाचकोरे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. वणी दोन माघार, १३ रिंगणात, राळेगावमध्ये आठ माघार १० रिंगणात, यवतमाळात १८ माघार, २२ रिंगणात, दिग्रस १० माघार, १३ रिंगणात, आर्णीमध्ये चार माघार, ११ रिंगणात, पुसदमध्ये १५ माघार, १५ जण रिंगणात आणि उमरखेड मतदारसंघात १७ जणांनी माघार घेतल्याने १९ जण रिंगणात आहे. गोंदिया जिल्हा जिल्ह्याच्या चार विधानसभा मतदार संघात एकूण ९२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ५१ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक १६ उमेदवार गोंदिया मतदार संघात, तिरोडा १४, अर्जुनी मोरगाव १३ तर आमगावमध्ये ८ उमेदवार रिंगणात आहेत. पक्षीय चिन्हावर लढणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. भंडारा जिल्हाजिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील ४१ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. आता ५३ उमेदवार रिंगणात राहणार असून आजघडीला तिन्ही क्षेत्रात चौकोनी लढतीचे चित्र आहे. तुमसर क्षेत्रात चार माघार, १३ रिंगणात, भंडारा १७ माघार, १९ उमेदवार रिंगणात तर साकोली क्षेत्रात २० उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २१ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असताना एकाच समाजातील अनेक उमेदवार असल्यामुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आ. अनिल बावनकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.बुलडाणा जिल्हाजिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये १६० इच्छुक उमेदवारांपैकी ५९ इच्छुकांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात १0१ उमेदवार आहेत. बुलडाणा मतदारसंघात १० माघार, १५ रिंगणात, मेहकर १५ माघार, १९ रिंगणात, सिंदखेडराजामध्ये आठ माघार, १२ रिंगणात, खामगाव पाच माघार, ११ रिंगणात, जळगाव जामोद चार माघार , १८ रिंगणात, चिखलीत ११ माघार, १२ रिंगणात, मलकापूर सहा जणांनी माघार घेतल्याने १४ उमेदवार मैदानात शिल्लक राहिले आहेत.वाशिम जिल्हाजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या १०५ उमेदवारांपैकी ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकूण ५७ उमेदवार रिंगणात आहेत. वाशिम २०, कारंजा २१ तर रिसोड मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत होण्याची चिन्हं दिसत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विदर्भात सर्वच पक्षांना बंडोबांचे आव्हान
By admin | Published: October 02, 2014 1:05 AM