- संदीप प्रधान, मुंबईशिवसेनेने गेल्या ४९ वर्षांत प्रथमच बिल्डर, व्यावसायिक, उद्योजक यांच्या आर्थिक सत्तेला आव्हान देण्याची भाषा केली आहे. आतापर्यंत राजकीय व आर्थिक सत्तेबरोबर मिळतेजुळते घेऊन वागणाऱ्या शिवसेनेची महापालिका निवडणुकांत भाजपाशी संघर्ष होणार असल्याने त्या पक्षासोबत राहिलेल्या भांडवलदारांना आव्हान देताना शिवसेनेची दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहेत. मांसाहाराच्या विषयावरून शिवसेनेने प्रथमच बिल्डर, व्यावसायिक यांना आमच्याशी टक्कर घ्याल तर तुमचे आर्थिक हितसंबंध उखडून टाकू, असा इशारा दिला आहे. आतापर्यंत हा वर्ग भाजपासोबत होता तर भाजपाची शिवसेनेबरोबर युती होती. त्यामुळे बिल्डर, व्यावसायिक, फिल्म फायनान्सर यांच्याशी शिवसेनेचे संबंध मधूर राहिले. दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईत अनेक बिल्डरांनी निवासी व व्यावसायिक टॉवर उभे केले तेव्हा त्याला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे सहकार्य व संरक्षण राहिले. अनेक मराठी कुटुंबांना आपली घरे सोडून उपनगरात वास्तव्य करण्याकरिता जावे लागले तेव्हा शिवसेनेने या आर्थिक सत्तेला आव्हान देण्याची भाषा केली नाही. उलटपक्षी शिवसेनेच्या काही नेत्यांनी उभ्या केलेल्या क्लबच्या संचालक मंडळात याच बिल्डर, व्यावसायिक यांचा समावेश राहिला आहे. किंबहुना मराठी टक्का घसरल्याने आता मुंबई महापालिकेत शिवसेनेपेक्षा भाजपा शिरजोर होण्याची शक्यता आहे.शिवसेनेने प्रारंभी मराठी माणसांच्या नोकऱ्यांचा विषय उपस्थित केला तेव्हा ज्या दाक्षिणात्यांच्या विरोधात आंदोलने केली ते नोकरदार होते. मुंबईतील उत्तर भारतीय, बिहारी यांच्या विरोधात शिवसेना उभी ठाकली ते टॅक्सी चालक, भेळवाले असे हातावर पोट असणारे होते. हिंदुत्वाची भूमिका घेऊन शिवसेना मैदानात उतरली तेव्हा हिंसाचाराची धग गोरगरीब मुस्लीम समाजालाच बसली. यावेळी प्रथमच बिल्डर, व्यावसायिक यांना शिवसेनेने ललकारले आहे. राजसत्तेतील भाजपा व त्यांचे पाठीराखे आर्थिक सत्ताधारी यांच्याशी एकाचवेळी दोन हात करताना शिवसेनेची दमछाक होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.शिवसेनेची बोटचेपी भूमिकाराजकीय सत्तेच्या विरोधातही शिवसेनेने बोटचेपी भूमिका घेतल्याचाच इतिहास आहे. देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा डावे, उजवे, समाजवादी विरोधात लढत असताना शिवसेना समर्थनार्थ उभी राहिली होती.वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दीर्घ कारकीर्दीत शिवसेनेची हेटाळणी ‘वसंतसेनाह्ण अशीच केले गेली होती. शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने अनेकदा शिवसेनेला आपल्यास अनुकूल भूमिका घेण्याकरिता पटवल्याचे दाखले आहेत.
सेनेकडून भांडवलदारांना आव्हान
By admin | Published: September 12, 2015 2:19 AM