पुणे : अरबी समुद्राहून येणारे वारे कमकुवत असल्याने तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांना जोर नसल्याने पुढील चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता नाही. ५ दिवसांनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या २४ तासात राज्यात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. गिरना ६०, मालेगाव ३०, अहमदनगर, पारोळा, श्रीरामपूर २०, अमळनेर, इगतपुरी, पुणे (पाषाण), सिंधखेडा १० मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद ६०, अंबड ५०, लोहा ४०, बदनापूर, गंगापूर, हिमायतनगर ३०, आष्टी, भोकरदन, बिलोली, उमारी २०, कळमनुरी, मुदखेड, परभणी, सोयेगाव, वैजापूर १० मिमी पाऊस पडला़ विदर्भात नागपूर ६०, कामठी ४०, हिंगणा, पारशिवनी, संग्रामपूर २०, अकोला, अकोट, भिवापूर, चांदूर बाजार, चिखलदरा, चिमूर, हिंगणघाट, कुही, मारेगाव, पवनी, रामेटक, सिंधखेड राजा, उमरेड, वर्धा १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रावरुन येणारे वारे कमकुवत आहेत. त्यामुळे या वाºयांमुळे कोकणातच अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील ४ दिवस अशीच स्थिती राहणार आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ दिवसानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, दक्षिणेकडून येणारे जादा दाबाचे वारे क्षीण झाले आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सध्या ढगांची निर्मिती होत नाही. तसेच सह्याद्री पर्वत ओलांडून जाईल, इतका जोर वाऱ्यांमध्ये नसल्याने राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता कमी आहे.२६ ते २७ जून रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.२८ व २९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात ४ दिवसानंतर मोठ्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 6:44 PM
राज्यात सध्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..
ठळक मुद्देनाशिक, अहमदनगर,पुणे, कोल्हापूर, सोलापूर इथे पावसाची शक्यता.