पुणे :पुणे, मुंबईसह कोकणात आगमन झालेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. येत्या २४ तासांत कोकणाचा उर्वरित भाग, गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरात मान्सून आगेकूच करण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पुढील २ दिवस कोकणासह संपूर्ण राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत मुंबई ३७.४, कोल्हापूर १२, रत्नागिरी २९.६, परभणी २१, अकोला ४४.८, पणजी १२७, पालघर ३८, अलिबाग ४९, गुहागर ३३, दापोली ४१, लांजा ३४, देवगड ६१, मालवण ६८, पार्थडी ६४, धुळे ६४, चंदगड ३०, पन्हाळा ४६, पैठण ४२, अक्कलकुवा ५६, सिन्नर ३७, जुन्नर २९, अहमदपूर ५२, लोहा ३०, पूर्णा ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात कोल्हापूर, रत्नागिरी, महाबळेश्वर, सातारा, मुंबई, पणजी येथे पाऊस झाला.
पुढील दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.