पुणे : राज्यात पुढील तीन-चार दिवसांत पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. बुधवारी कोकणात तर गुरूवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.दक्षिण तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी व गुरूवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीचे प्रमाण अद्याप कमी आहे. रविवारी विदर्भाच्या काही भागात किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली. तर कोकण व मध्य महाराष्ट्रात काही भागात किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली. रविवारी राज्यात सर्वात कमी तपमान नागपूर येथे ११.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नाशिकला ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (प्रतिनिधी)
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
By admin | Published: December 07, 2015 2:12 AM