ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि २२ - मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दि. २२ - २४ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार, मध्य महाराष्ट्र मधील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
या कालावधीत नागरिकांनी गारपीट सुरु असताना बाहेर पडण्याचे टाळावे, दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, ज्या धान्याची कापणी झालेली आहे, ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, गारपीटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, गारपीट सुरु असताना वीजेच्या तारा तुटण्याची शक्यता असते. त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.