पुणे : अरबी समुद्रावरुन येणारे बाष्प महाराष्ट्रात पसरले आहे. परिणामी राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे 5.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा जोर असल्याने सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या परिसरातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. विदर्भात काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. पुढील दोन दिवसात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली आहे.
३० डिसेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़
इशारा : ३० डिसेंबरला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता. ३१ डिसेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १ व २ जानेवारी रोजी विदर्भात विजांचा कडकडाटास गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात ३० डिसेंबरला तुरळक ठिकाणी एक -दोन पावसाच्या सरी येण्याची शक्यता. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ३१ डिसेंबर, १ व २ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेस गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.