'वंचित'ची राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता धुसर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:30 AM2019-08-28T11:30:05+5:302019-08-28T11:32:45+5:30
राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला गांभीर्याने घेतले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर आघाडीला जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेणार हे निश्चित मानले जात होते. परंतु, अजुनही योग्य दिशेने बोलणी झाली नसून राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीत वंचित सामील होण्याच्या आशा धुसर दिसत आहे.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सुरुवातीला ४० जागांची ऑफर दिली होती. त्याचवेळी राज्यभर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यानंतर आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडण्याची अट ठेवली. एकूणच आंबेडकरांकडून काँग्रेसला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. अशा स्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्य पातळीवरील नेत्यांना सूचना केल्या आहेत.
राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या आशा दिवसेंदिवस धुसर होत आहेत. तसेच प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उपाययोजनाही सुचविल्याचे समजते.
दलित आणि मुस्लीम मतदारांना एकत्र करून प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. या आघाडीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आघाडीच्या डझनभर जागा वंचितमुळे पडल्या. परंतु, हा प्रभाव कमी करण्यासाठी दलित आणि मुस्लिमांना अधिक प्रमाणात उमेदवारी दिल्यास आंबेडकरांची ताकत कमी करणे शक्य असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राखीवपेक्षा २० टक्के अधिक जागांचा मागासर्गीयांना आणि मुस्लिमांना देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या उपाय योजनेमुळे देखील वंचित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट होते.