Chandgad Vidhan Sabha Assembly Election Result 2024 : गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे २४ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयानंतर शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले.
महागाव येथे शनिवारी (दि.२३) शिवाजी पाटील यांचे काही महिला औक्षण करत असताना मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्याने आगीचा भडका उडाला. महिला औक्षण करत असताना जेसीबीने शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकण्यात येत होता. यावेळी हा आगीचा भडका उडाला. यामध्ये काही महिला आणि शिवाजी पाटील किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नेमकी कोण जिंकणार, याबाबत मोठ्या चर्चा झाल्या होत्या. अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले; मात्र या सगळ्याला छेद देत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी जायंट किलरची भूमिका घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. गेल्या १५ वर्षात बंडखोराला यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघात पाच तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून नंदा बाभूळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील यांच्यासह जनसुराज्यचे मानसिंग खोराटेही रिंगणात आले होते. मात्र, पहिल्यापासून शेवटच्या फेरीपर्यंत आमदार पाटील विरुद्ध शिवाजीराव पाटील यांच्यातच खरी लढत झाली.
उमेदवारांना मिळालेली मते... शिवाजीराव पाटील - भाजप बंडखोर - ८४,२५४ - विजयीराजेश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - (६०,१२०) डॉ.नंदिनी बाभूळकर-कुपेकर - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - (४७,२५९)मानसिंग खोराटे - जनसुराज्य शक्ती पक्ष - २२१०७अप्पी पाटील - काँग्रेस बंडखोर - २४५८२