सांगली, दि. 17 - विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारातून आठजणांच्या टोळीने तीन चंदनाची झाडे बुधवारी मध्यरात्री लंपास केली. गार्ड ड्युटीवरील पोलिसाने टोळीचा रायफल घेऊन पाठलाग केला. पण टोळीने अंधाराचा फायदा घेत रेल्वे रुळावरुन साद्रीनगरकडे पलायन केले. याप्रकरणी अज्ञात आठजणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
पोलीस मुख्यालयाचा परिसर खूप मोठा आहे. चंदनासह विविध प्रकारची झाडांची तेथे लागवड केली आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील आठजणांच्या टोळीने मुख्यालयाच्या आवारात प्रवेश केला होता. कृष्णा मॅरेज हॉलजवळ चंदनाची झाडे आहेत. यातील तीन झाडे टोळीने करवताच्या मदतीने तोडली. झाडाच्या फांदा जमिनीवर पडल्याने त्याचा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून गार्ड ड्युटीवरील पोलिस शिपाई शरद मेंगाळ यांनी रायफलसह धाव घेतली. पोलीस आल्याची चाहूल लागताच टोळीतील सदस्यांनी तेथून पलायन केले. मेंगाळ यांनी त्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेत सर्वजण हॉलजवळील संस्कार भवनमार्गे रेल्वे रुळाकडे पळून गेले. तेथून ते साद्रीनगरच्या दिशेने गेले.
मेंगाळ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. मध्यरात्रीच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. त्यानंतर विश्रामबाग परिसरात नाकेबंदीही करण्यात आली. परंतु टोळीचा सुगावा लागला नाही. टोळीने तीन झाडे तोडल्याचे निष्पन्न झाले आहे. मेंगाळ यांनी पाठलाग केल्याने टोळीतील सदस्यांनी चंदनाच्या झाडाच्या फांद्या तिथेच टाकल्या. केवळ बुंदे घेऊन पलायन केले. टोळीतील सदस्यांच्या हातात करवत, लाकडी दांडके होते. कदातिच ते मोठे वाहन घेऊन आले असण्याची शक्यता आहे. हे वाहन त्यांनी साद्रीनगर रेल्वे पुलाजवळ लावले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मेंगाळ यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दहा हजार रुपये किंमतीची चंदनाची झाडे चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुख्यालयात परिसरात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. यापूर्वीही झाडांची चोरी झाली आहे. १२ ऑक्टोंबर २०१६ रोजी झाडे तोडताना एका टोळीला पकडले होते. ऑक्टोबरमध्ये पकडलेल्या टोळीनेच ही चोरी केली आहे का, याचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.