बाळासाहेब बोचरे, पंढरपूरधन्य धन्य पांडुरंगसकळ दोष होय भंगपूर्वज उद्धरी सांगपंढरपूर देखलियासावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी गेले काही दिवस संत-सज्जनांच्या पालख्यांसोबत चाललेले वारकरी पंढरीत आल्यानंतर चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आला. अवघी पंढरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली.सुमारे ११ लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत दाखल झाली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत सर्वाधिक साडेतीन लाख वारकरी आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत तीन लाख, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ यांच्यासमवेत मिळून सुमारे एक लाख भाविक आहेत.संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत दामाजीपंत, श्री चांगावरेश्वर, संत जगनाडे महाराज, चौरंगीनाथ बाबा, संत गोरोबाकाका आदी पालख्याही येथे दाखल झाल्या आहेत. वाखरीतून निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी संत मुक्ताबाई, संत नामदेव यांच्या पालख्या पंढरपुरात विसाव्यापर्यंत आल्या. माऊलींतर्फे मुक्ताबाईला साडी-चोळी तर मुक्ताबार्इंतर्फे माऊलींना उपरणे देऊन भावनिक नाते जपण्यात आले. येथे माऊली व संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण झाले.
चंद्रभागेला आला भक्तीचा महापूर!
By admin | Published: July 27, 2015 1:05 AM