आमजाई व्हरवडे : ‘भोगावती’च्या निवडणुकीत काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी, भाजप, शेकाप, शिवसेना एकत्र येऊन संस्थापक दादासाहेब पाटील (कौलवकर) महाआघाडीची स्थापना करण्यात आली. उद्या, शनिवारी या महाआघाडीच्या प्रचार प्रारंभाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना निमंत्रित केले आहे. जिल्ह्यातील हे दोन कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर येणार काय? याकडे भोगावती परिसराच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व हसन मुश्रीफ या दोन नेत्यांच्या पक्षांची ‘भोगावती’ला महाआघाडी उदयास आली. या आघाडीचाच उद्या प्रचार प्रारंभ आहे. या प्रचार प्रारंभाला या दोन नेत्यांसह शेकापचे संपतराव पाटील, चंद्रदीप नरके, आदी नेत्यांना आमंत्रित केले आहे.भाजपचा वारू रोखण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जि. प. मधील दोन्ही काँग्रेसची हातातोंडाशी आलेली सत्ता चंद्रकांतदादांनी हिसकावून घेतल्याने दोन्ही काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. भाजपचा शिरकाव ‘भोगावती’त तरी होता कामा नये, यासाठी मुश्रीफ यांनी शेवटपर्यंत दोन्ही काँग्रेसला एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. दुर्दैवाने भाजपला महाआघाडीत सामील करण्याची वेळ आली. या विविध राजकीय घडामोडींनी खुद्द मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यापासून मुश्रीफ, ए. वाय. पाटील लांबच असल्याचे दिसत आहे. उद्या या आघाडीचा प्रचार प्रारंभ होत आहे. त्यामुळे या निमित्ताने दोन राजकीय कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार काय? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (वार्ताहर)बैठकीला मुश्रीफ, ए. वाय. यांची दांडीकाल कोल्हापुरात एका हॉटेलवर महाआघाडीच्या नेत्यांची बैठक नियोजन करण्यासाठी बोलविली होती. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पाटील, धैर्यशील पाटील (कौलवकर), आदी नेते उपस्थित होते. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील यांनी दांडी मारल्याने महत्त्वाच्या बैठकीचा नूरच बदलून गेला.
चंद्रकांतदादा-मुश्रीफ एकाच व्यासपीठावर ?
By admin | Published: April 15, 2017 1:12 AM