मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे आलबेल आहे. सरकार उर्वरित कार्यकाळ पूर्ण करणार, असे विधान शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून बाहेर पडल्यानंतर केले. त्यातच, ‘‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची मुदत संपल्याने राज्यातील सत्तांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कोणाला उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या; पण सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे, आणखी तीन वर्षे सरकार टिकणारच, अशी प्रतिक्रिया खा.राऊत यांनी दिली. वर्षा बंगल्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील विधानाचा वेगळा अर्थ काढून काही जणांच्या आशा वाढल्या असतील; पण त्यात तथ्य नाही. भावी मित्र असा जो उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा अर्थ हा तिकडचे काही नेते महाविकास आघाडीत येऊ इच्छितात, असा होतो. त्यामुळे मुख्यमंत्री अचानक नाही तर जाणीवपूर्वक तसे बोलले होते. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे आणि सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावा राऊत यांनी केला. पाटील दिलेली मुदत आज संपल्याने त्यांचा दावा फुसका ठरला.
आजी, माजी अन् भावी- देहू (जि.पुणे) येथे आयोजित एका कार्यक्रमात संचालनकर्त्याने पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला, तेव्हा व्यासपीठावर असलेल्या पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, असे विधान केले होते.- पाटील यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील भाषणात, ‘माजी अन् एकत्रित आलो तर भावी’ असा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडे कटाक्ष टाकून केल्याने खळबळ उडाली होती.