कोल्हापूर : कन्नड अभिमान गीत गाऊन कर्नाटकची स्तुती करणा-या महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न सीमाभागातील नागरिकांनी मंगळवारी केला. मंत्री पाटील यांच्या घरापासून काही अंतरावरच पोलिसांनी हा मोर्चा अडविला. यावेळी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करणा-या आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी बेळगावच्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह २६ आंदोलकांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.महाराष्टÑ एकीकरण समितीचे कार्यकर्ते मंगळवारी बेळगाव, निपाणी येथून आले होते. ते संभाजीनगर परिसरातील मंत्री पाटील यांच्या घराकडे मोर्चाने निघाले. संभाजीनगर झोपडपट्टीजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडविला. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने सुरू केली. काही आंदोलक पोलिसांचे कडे तोडून पुढे जाऊ लागले. यावेळी पोलीस व आंदोलकांदरम्यानझटापट झाली. काही आंदोलक रस्त्यावर झोपले. त्यांना अक्षरश: उचलून पोलिसांनी व्हॅनमध्ये घातले.आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या प्रमुख, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, रूपा नावलेकर, मदन बामणे, सूरज कणबरकर, पीयूष हावळ, सुनील बाळेकुंद्री, अमर येल्लूरकर आदींनी केले.ही तर दडपशाही-चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केले, त्याचा निषेध करण्याकरिता येथे आलो. पोलिसांनी सुरुवातीला तुम्ही आमचेच आहात असे म्हणत आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले. आंदोलन करू दिले नाही. पोलिसांची ही दडपशाही असल्याचे बेळगावचे माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी सांगितले.
चंद्रकांतदादांच्या घरावर सीमावासीयांचा मोर्चा, पोलिसांशी झटापट; बेळगावच्या माजी महापौर, उपमहापौरांसह २६ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:16 AM