मुंबई - अजित पवार यांनी रात्री उशिरा भाजपासोबत हातमिळवणी करुन सत्तेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत ८ आमदार शपथविधीला उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शपथ दिली. मात्र त्यानंतर आता शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर उद्धव ठाकरेंचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकमतला दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून राज्यात रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहे. काळ रात्रीपर्यंत महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याचे चित्र असताना, आज सकाळी फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भूमिका ही वैयक्तिक असून ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हंटले आहे.
तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या आहे. तसेच या मुद्यावरून शिवसेनामध्ये सुद्धा नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे काय भूमिका घ्यायची यासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत असून शिवसैनिकांमध्ये प्रचड रोष असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहे.
आज सर्व माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बातम्या छापुन आल्या होत्या. मात्र त्यानंतर जे राजकीय घडामोडी घडल्या आहेत, ते पाहता हे उद्धव ठाकरे यांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. तसेच शिवसैनिकांमध्ये चीड असून, ते नाराज असल्याचे सुद्धा चंद्रकांत खैरे हे लोकमतशी बोलताना म्हणाले.