- रवींद्र देशमुख
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सुरक्षीत मतदार संघाचा शोध संपला आहे. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सुरक्षीत असा वरळी मतदार संघ निवडला आहे. याउलट रोहित पवार यांनी राष्ट्रवादीने कधीही न जिंकलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघातून आपली विधानसभेची कारकिर्द सुरू करण्याचं ठरवल आहे.
चंद्रकांत पाटील आतापर्यंत विधान परिषदेवर निवडून येत आहेत. जनतेतून निवडून न येणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, अशी टीका विरोधकांकडून नेहमीच पाटील यांच्यावर होते. त्याला उत्तर देण्यासाठी पाटील यांनी चाचपणी केली होती. त्यातच आता भाजपकडून पाटील यांना निवडणूक लढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पाटील यांच्याकडून सुरुवातीला पुण्यातील कसबा मतदार संघाची चाचपणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाटील यांना कोथरूडचा पर्याय सुचविण्यात आला. परंतु, तेथूनही त्यांना विरोध झाला असला तरी उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सुरक्षीत मतदार संघ का हवा, असा प्रश्न उपस्थित कऱण्यात येत आहे.
दरम्यान शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी वरळी हा मतदार संघ आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी निवडला आहे. शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे. आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुख आहेत.
दुसरीकडे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सुरक्षीत मतदार संघाच्या भानगडीत न पडता, राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने सुरू करण्यासाठी खडतर मतदारसंघ निवडला आहे. तसेच मागील 2 ते 3 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदार काम सुरू केले आहे. या निमित्ताने रोहित यांनी नवा पायंडा पाडला असून आधी काम मग उमेदवारी यावर भर दिला आहे.