सोलापूर : मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मतभेद असावेत, पण जगजाहीर नसावेत. आगामी काळ खूप कठीण आहे. भाजपशी लढायला सर्वजण एकत्र येतील. तुम्ही आपसातील मतभेद विसरुन प्रेमाने राहा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. सोलापूर येथील भाजपच्या कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.
आगामी महापालिका,विधानसभा निवडणुकीत सगळे जण एकत्र येतील. भाजपशी एकट्याने लढायचे ते धाडस करणार नाहीत. सध्या ते भाजपशी अतिशय खुनशी पणाने वागत आहेत. त्यामुळे भाजपने घेतलेले निर्णय रद्द करण्यात येत आहे. चौकशी लावत आहेत. एवढं झालं तरी विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. त्यामुळे तुम्हाला आता एकत्र येवून, बांधिलकी ठेवून काम करावे लागेल, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
तर पुढे बोलताना ते म्हणाले, शहरात निवडणुकीत खूप चांगले निकाल लागतात. पण सारखं आपापसात काहीतरी चालतं. घरात भांडण नेहमीच चालतं. पण घरातलं भांडण बायको दुसऱ्या दिवशी जाऊन 'लोकमत'ला देत नाही. आमचं भांडण झालंय. त्यांनी मला मारलंय. सेल्फी वगैरे काढलाय आणि हा छापा...असं कुणी सांगत नाही. तसं आपल्या घरातलं भांडण आपल्यापुरतेच ठेवू. भांडणं नाहीत, मतभेद नाहीत असं होत नाही. पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास काढला तरी एकमेकांमध्ये संघर्ष आहेच. इथे मतभेदाचे रुपांतर एकमेकांकडे पाहायचं नाही, अशा पध्दतीनं होतंय. हे बंद करा, असा सल्लाही चंद्रकांतदादांनी यावेळी दिला.