मुंबई-
शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गुजरात भाजपाच्या काही नेत्यांसोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात वेगळी समीकरणं जुळू पाहाताहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. "एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून ते नाराज असल्याचं मी टेलिव्हिजनवर पाहिलं. शिवसेनेचा हा पक्षांतर्गत विषय असून याबाबत आम्हाला अद्याप काहीच कल्पना नाही. जनतेनं दिलेलं बहुमत नाकारुन राष्ट्रवादी-काँग्रेससोबत केलेला घरोबा त्यांना पटलेला नसावा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 'ही' सात कारणं ठरली महत्वाची, शिवसेनेच्या गोटातून मोठी माहिती आली समोर...
एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असं विचारण्यात आलं असता चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच याचं भाजपा पक्ष स्वागत करेल, असं म्हटलं आहे. "आम्ही काही भजनी मंडळी नाही. आम्हीही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे असा काही प्रस्ताव आला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे अशापद्धतीचं कोणताही प्रस्ताव भाजपाकडे आला तर आम्ही नक्कीच त्याबाबत विचार करू", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राऊतांमुळेच आजची परिस्थितीचंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला संजय राऊत यांना जबाबदार धरलं. "संजय राऊत महान नेते आहेत. त्यांच्या महानतेमुळेच शिवसेना अडचणीत आली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर आजची वेळ आली आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.