पुणे - आज (रविवारी) शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संजय राऊतांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. या गळाभेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी -राऊत आणि फडणवीस यांच्या, या गळाभेटीसंदर्भात विचारले असात, चंद्रकांत पाटील म्हणाले, “आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन (शत्रू) जरी असला तरी तो त्या नावाच्या जागी. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. त्यामुळे संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याला देवेंद्र फडणवीस यांनी जायलाच हवे होते आणि स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे राजकीय विचार वेगळे असले तरीही, अय... म्हणून आपण प्रेमाने मिठी मारतोच.”
अशी झाली राऊत-फडणवीसांची गळाभेट -संजय राऊतांची मुलगी पूर्वशी हिचा साखरपुडा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी झाला आहे. या कार्यक्रमाला विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, हे सोबतच पोहोचले होते. यावेळी नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला असलेले संजय राऊत फडणवीसांकडे आले आणि त्यांची गळाभेट घेतली.नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसह फडणवीसांनी फोटोही काढले -या गळाभेटीदरम्यान राऊत आणि फडणवीस यांच्या चेहऱ्यावर खास हास्यही दिसून आले. यानंतर मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसह फडणवीसांनी फोटोही काढले. यानंतर दरेकर यांनी मल्हार आणि पूर्वशीला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.