Chandrakant Patil vs NCP: भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची पनवेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतला असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. या विधानामुळे भाजपासोबत सत्तास्थापना करणारा शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची गंभीर दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश दिले. पण याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने चंद्रकांतदादांना लक्ष केले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशांमुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. मात्र आपण हे दु:ख पचवून पुढे गेलो, कारण आपल्याला पुढे जायचं होतं, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीने टीका केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज मनातील खदखद व्यक्त केली. मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं, असं ते म्हणाले. कोर्टाच्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. आमचं म्हणणं आहे की हे सरकार असंवैधानिक आहे. पण कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेले भाजपाचे लोक भविष्यात हा मनावर असलेला दगड कोणाच्या तरी गळ्यात बांधून त्यांना बुडवणार तर नाहीत ना, असा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. विरोधक या विधानावर सडकून टीका करत आहेत. ही टीका झाल्यानंतर भाजपच्या दिल्लीतीत पक्षश्रेष्ठींनीही त्याची गंभीर दखल घेतली असून या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपाला शिंदे गटाला सांभाळून घेण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी, शिंदे-फडणवीस सरकारचं काम एकत्रितपणे आणि उत्तमरित्या सुरू आहे, असं सांगितलं आहे.