मुंबई : महायुतीच सरकार येणार असल्याचे वाटत असताना विश्वासघात झाला. जनादेश होता की भाजप आणि शिवसनेने मिळवून सरकार स्थापन करावे. मात्र त्या जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रामध्ये एक अभद्र सरकार आले आणि अनैतिक युती झाली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेला पाटील संबोधित करत होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपला मिळाली असून याची सर्वसामन्यांना माहिती आहे. तर लोकांनी भरभरून विश्वास व्यक्त केला तर लोकांची हिच इच्छा होती की, युतीचंचं सरकार चालले पाहिजे आणि आजही आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी भाजपचा जिंकण्याचा वेग जास्त होता असेही पाटील म्हणाले.
तर याचवेळी त्यांनी शिवसेनेवर सुद्धा निशाणा साधला. सेनेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिवसातून दोन-दोन जाण्यासाठी वेळ होता. दिल्लीत जाऊन सोनिया गांधींना भेटायला वेळ होता. मात्र महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला फोन घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. तर शिवसेनेने फक्त भाजपचं नाही, तर महाराष्ट्रातील जनता व शेतकऱ्यांसोबत सुद्धा दगा केला असल्याचे पाटील म्हणाले.