मुंबई : अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) मृत्यू प्रकरणी चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी जे केले, तेच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी केली आहे. (chandrakant patil demands that now sharad pawar should take dhananjay munde resignation)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली.
संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई
सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं
सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा म्हणजे सत्याचा विजय आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. याप्रकरणात संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा ही पहिली पायरी आहे, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्याने शिवसेनेने राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले. अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.