मुंबई: पुण्यातील कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, चंद्रकांत पाटील ग्रामीण मतदारसंघातून निवडणुक लढणार असतील तर त्यांच्याविरोधात मी लढण्याची घोषणा केल्यानेच चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत टीका केली आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुण्यातील ब्राम्हण महासंघाकडून विरोध होतो आहे. त्यामुळे पुण्यातील ब्राम्हण महासंघाने मला चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी मला निमंत्रण दिलं आहे. मात्र मी हे निमंत्रण स्वीकारले नाही, असं देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे. कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. तसेच ब्राह्मणच उमेदवार हवा, अस सांगत मेधा कुलकर्णी यांनाच पाठिंबा दर्शविला होता. त्यातच कुलकर्णी यांचा पत्ता कापला अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून कुलकर्णी यांची नाराजी दूर केल्याचे समजते.