मुंबई - राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असं वातावरण विधानसभा निवडणुकीपूर्वी होते. मतचाचण्यांमध्ये देखील भाजप बहुमताच्या जवळ दाखवण्यात आले होते. त्यानुसार भाजपमधील अनेक नेत्यांचे पालकमंत्रीपद निश्चित मानले जाऊ लागले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित होते. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यामुळे त्यांची ही संधी हुकली.
आधीच्या सरकारमध्ये विधानपरिषद सदस्य असलेल्या पाटील यांनी पुण्यातून विरोध झाल्यानंतरही कोथरूडमध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला. राज्यात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार हे निश्चित मानले जावू लागले. मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप पक्ष सत्तेपासून दुरावला.
पुण्याच्या कारभाऱ्यावरून राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. मागील पाच वर्षांच्या काळात गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचा कारभार होता. तर त्याआधी अजित पवार यांनी पुण्याचा कारभार पाहिलेला आहे. बापट केंद्रात गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच पुण्याचं पालकमंत्रीपद येणार अशी शक्यता होता. मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची ही संधी हुकली असून पुन्हा एकदा अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार अशी शक्यता आहे.