मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईभाजपा अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली.
राज्यात भाजपाची सत्ता गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच, भाजपाच्या या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे या नेत्यांचा समावेश होता. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुन्हा राज्यातील भाजपाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सोपविली आहे. तर, मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाला म्हणावे, तसे यश मिळवता आले नाही. तरीही भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. तर, दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपा अध्यक्षपद देण्याची चर्चा होती. मात्र, मंगलप्रभात लोढा यांनाच मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.