विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आ. मंगलप्रभात लोढा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. दोघांचीही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी केली.तत्कालिन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा गेल्यावर्षी मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी पाटील हे महसूल व बांधकाम मंत्रीदेखील होते. यावेळी त्यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी दिली जाईल, असे निश्चित मानले जात होते. दानवे पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून परतणार अशी चर्चा मध्यंतरी होती पण पाटील हेच पुन्हा प्रदेशाध्यक्ष होणार हे लोकमतने दिलेले वृत्त खरे ठरले.चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने भाजपने पुन्हा मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील असलेले पाटील हे पुण्यातील कोथरुडचे आमदार आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती मानले जातात. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा लोढा यांच्यावरच विश्वास टाकला.नवी मुंबईतील अधिवेशनात १६ला सूत्रे स्वीकारणारचंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नवी मुंबई येथे १६ फेब्रुवारीला होणाºया प्रदेश अधिवेशनात स्वीकारतील, अशी माहिती माजी मंत्री विनोद तावडे यांनी दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या मुख्य उपस्थितीत हे दोन दिवसांचे अधिवेशन होणार आहे.गेली दोन वर्षे पक्षाचे विस्तारक म्हणून काम करणाºया विस्तारकांकडून विधानसभा निवडणुकीतील जयपराजयाची कारणे जाणून घेतली जातील. त्या आधारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे नियोजन यावर विचार केला जाणार आहे. खुल्या अधिवेशनात पक्षाची पुढील दिशा, कार्यक्रमांची घोषणा केली जाईल.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड; मुंबई अध्यक्षपदी पुन्हा लोढा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 5:04 AM