कोल्हापूर: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा यंदाचा वाढदिवस खास ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे रविवारपासून चंद्रकांत दादांनी प्रभारी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्याहून परतेस्तोवर म्हणजेच 16 तारखेपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे राहतील. त्यामुळे यंदाचा वाढदिवस कायम त्यांच्या स्मरणात राहील.वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आज अनेक कार्यकर्ते चंद्रकांत दादांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रभारी मुख्यमंत्रीपद आणि कृषीमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे कळले. यामुळे सर्व कार्यकर्ते चांगलेच आनंदात होते. चंद्रकांत दादांनीही सर्वांना पेढे वाटून हा आनंद साजरा केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारीही चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली. या दोन मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळ आणि संघटनेतील दबदबा नव्याने सिद्ध झाला आहे.