मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होणार हे जवळपास निश्चित असून, त्यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मराठा वा ओबीसी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.
नवे प्रदेशाध्यक्ष हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी नसतील. ओबीसी चेहऱ्याचा विचार केला तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ. संजय कुटे, आ. राम शिंदे यापैकी एकाला संधी दिली जावू शकते. त्याचवेळी मराठा समाजाचा चेहरा देण्याचे ठरले तर कोल्हापूरचे सुरेश हळवणकर, माजी मंत्री संभाजी निलंगेकर पाटील, रवींद्र चव्हाण, आ. रणधीर सावरकर यांच्यापैकी एका नावाला पसंती दिली जाईल. माजी मंत्री आशिष शेलार यांचेही प्रमुख नाव आहे पण मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये त्यांची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा विचार मंत्रिपदासाठी होवू शकतो.
शहरी भागाऐवजी ग्रामीण भागातील नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असे मानले जाते. २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक समोर ठेवून राज्यभर फिरण्याची क्षमता, पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्याचा गुण हे निकषही लावले जातील असे मानले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असणाऱ्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. कारण, सत्ता व पक्ष या दोघांचा चांगला समन्वय राहिला तर पुढील निवडणुकांमध्ये त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल असे म्हटले जाते.