कोल्हापूर- जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. जनतेतून निवडून येण्याचे आव्हान करणाऱ्या विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आता कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, केंद्रीय नेतृत्वानं मी विधानसभा लढवावी, असा निर्णय घेतला आहे.कोल्हापुरात दोन्ही आमदारांना बाजूला व्हा मी लढतो, असं सांगता येत नाही. काही भविष्यातील गणितंही केंद्रीय नेतृत्वाच्या मनात असतील. तुला पुण्यातून कोथरूड लढवायची आहे, असं केंद्रीय नेतृत्वानं सांगितलं आहे. कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला तिथून भाजपाला एक लाख 50 हजारांचं मताधिक्क्य मिळालं होतं. पुणेकर मला बाहेरचा म्हणणार नाहीत. कोथरूड माझ्याइतकं कोणालाच माहीत नाही. गेल्या 13 वर्षांपासून मी कोथरूडमध्ये येतोय. 12 वर्षं पुणे पदवीधरचा मी आमदार राहिलेलो आहे. मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री म्हणून मी पुण्यात वारंवार जात असतो. पुण्यातील गल्ल्यागल्ल्यात माझी ओळख असल्यानं पुणेकर मला परका मानणार नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.
सध्या कोथरुड मतदारसंघामध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णी या आमदार आहेत. कोथरुड मतदारसंघामधून पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता निर्माण होताच आता अखिल भारतील ब्राह्मण महासंघाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. प्रसंगी ब्राह्मण महासंघाने स्वतः चा उमेदवार उभा करण्याची तयारी देखील दर्शवली आहे. युतीत शिवसेनेकडे असणारा कोथरुड मतदारसंघ 2014ला भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने भाजपाकडे गेला. सध्या भाजपाच्या मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या आमदार आहेत. भाजपा अनेक विद्यमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यंदा विधानसभेची निवडणूक कोथरूड मतदारसंघातून लढवणार आहेत. कोथरुड मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाजाची मते जास्त आहेत. त्यामुळे आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून त्यांना विरोध केला जात आहे.